ब्लाॅग

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष शेतीचे अतोनात नुकसान


नोव्हेंबर उजाडला,दिवाळी संपली तरीही पाऊस थांबायचं नावच घेत नाही, त्यामुळे नाशिक जिल्ह्यात द्राक्ष शेतीचे अतोनात नुकसान होत आहे.

 या पावसामुळे द्राक्षावर डावणी,करपा,कुज,सडवा या प्रकारचे शंभर टक्के नुकसान करणारे रोग थैमान घालत आहे.
शेतकरी द्राक्ष उत्पादक रात्रंदिवस फवारण्या करून अक्षरशः मेटाकुटीला आला आहे.होत असलेला खर्च वाढत चालला आहे,डिझेल साठी खिशात पैसे नाही.

मुलाबाळाप्रमाणे द्राक्षाला जपणाऱ्या शेतकऱ्याला सुचतच नाहीये काय करावे ते. छाटण्या झालेल्या बागेमध्ये 30 ते 40 दिवसातच पूर्ण हंगामभर केला जाणारा खर्च होऊन गेला आहे.
 त्यामुळे भांडवलाची वानवा तयार झालीच सोबत दुकानदारांकडून आता औषधे,खते मिळत नाही. उधारी वाढत चाललीये, दुकानात स्टोक संपला आहे. निसर्ग कोपला आहे, रोजच अवेळी येणारा पाऊस आणि पूर्णतः कोलमडलेले नियोजन यामुळे शेतकऱ्याची अक्षरशः त्रेधातिरपीट उडाली आहे. सर्वसाधारणपणे नाशिक जिल्ह्यातल्या 80 टक्के बागा याचा छाटणी झाल्या आहे. यातल्या 50 टक्के बागा खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. असे झाले तर नाशिक मधील द्राक्ष इंडस्ट्री आणि यावर अवलंबून असलेला व्यापार आतबट्ट्यात येऊ शकतो. गेले तीन-चार वर्षापासून द्राक्षे इंडस्ट्रीवर अनेक प्रकारचे नैसर्गिक संकट येत आहेत. पण या वर्षीचे हे अवकाळी पावसाचे संकट फारच भयानक स्वरूपाचे आहे. शेतकऱ्यांची मानसिकता कमालीची खालावलेली आहे. काही ठिकाणी पुढे खर्च करावा की नाही करावा,करावा तर कसा करावा याची विवंचना उत्पादकांना लागून राहिली आहे.

द्राक्ष पिक अत्यंत खर्चिक आणि संवेदनशील आहे या पिकाला निसर्गाची अनुकूल परिस्थिती असणे फार महत्त्वाचे असते परंतु यंदा अंत्यत प्रतिकूल परिस्थिती असल्याने नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचा अक्षरशः कंबरडेच मोडले आहे.

एकरी 2 लाख रु होणारा खर्च, शाश्वत नसलेली बाजारपेठ,अस्मानी सुलतानी संकट,रोगराई या सर्व संकटामुळे द्राक्ष शेतीवर विपरीत परिणाम झाला आहे...